मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. cmf fellowship program
पात्रता
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
1. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)
2. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल
3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
4. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
स्वरूप
1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.
2. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.
3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.
6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल. cmf fellowship program